उल्हासनगर दि. ३ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर शहरात सभासद नोंदणी अभियानाला सोमवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कल्याण लोकसभा जिल्हा संघटक ॲड.कल्पेश माने आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाचा शुभारंभ कॅम्प क्र. ३ येथील आर. के. तलरेजा महाविद्यालयातून करण्यात आला.

अभियानाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सभासदत्व स्वीकारत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम राहिल्याने पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव यांच्यासह जिल्हा व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत संघटनेच्या उद्दिष्टांबाबत माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विविध हक्कांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सोमवारपासून सुरू झालेली ही सभासद नोंदणी मोहीम आता उल्हासनगर शहरातील सर्व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा संघटक ॲड. कल्पेश माने आणि शहर अध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली. “विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी संघटित होणे ही काळाची गरज असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्य होऊन या अभियानात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले. या सभासद नोंदणी अभियानाला विद्यार्थ्यांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता आगामी काळात शहरातील विविध महाविद्यालयांमध्येही मोठ्या प्रमाणावर नोंदणी होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





























