उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगरच्या पॅनेल क्रमांक १२ मधील के.बी. रोड, आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रवेशद्वाराचे आज उत्साहपूर्ण वातावरणात लोकार्पण करण्यात आले. महापौर अश्विनी कमलेश निकम, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी तसेच स्थानिक नगरसेविका व आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.

आनंदनगर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की, परिसरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य प्रवेशद्वार उभारण्यात यावे. या मागणीची दखल घेत स्थानिक नगरसेविका व आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी माजी आमदार पप्पू कलानी, महापौर अश्विनी कमलेश निकम, सभागृह नेते अरुण आशान, स्थायी समिती सभापती कुलवंत सिंग सोहटा, शहर प्रमुख भुल्लर महाराज आणि महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ निधी मंजूर करून प्रवेशद्वार उभारणीस मान्यता दिली. त्यानुसार १ मार्च २०२६ रोजी भूमिपूजन करण्यात आले. अल्पावधीतच आकर्षक आणि भव्य प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले. अखेर १ ऑगस्ट २०२६ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी या प्रवेशद्वाराचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. तसेच हे प्रवेशद्वार परिसराच्या ओळखीचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास शिवसेनेचे विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नेते महादेव सोनवणे, व्यापारी नेते सुमित चक्रवर्ती, नगरसेविका तथा सभापती संगमित्रा हजारे, एल. बी. पाटील, नगरसेविका तथा सभापती संगीता सपकाळे, भगवान मोहिते, रामेश्वर गवई, दशरथ चौधरी, संतोष मिसाळ, अमोल सरदार, अशोक जाधव, आदिनाथ पालवे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रा. दीपक साठे, समाधान प्रधान आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिवाजी रगडे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर अश्विनी कमलेश निकम तसेच स्थानिक नगरसेविका सविता तोरणे रगडे यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी सांगितले की, “सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, लोकप्रतिनिधींच्या पाठबळामुळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे पॅनेल क्रमांक १२ मध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचे हे भव्य प्रवेशद्वार साकार झाले आहे. ही केवळ वास्तू नसून उल्हासनगरकरांसाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक भेट आहे.” या भव्य प्रवेशद्वाराच्या लोकार्पणामुळे आनंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा उपक्रम उल्हासनगरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





























