उल्हासनगर दि. १ ( प्रमोद दळवी ) : रमाकांत चव्हाण रिक्षा चालक-मालक संघटना, उल्हासनगर यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ पासून वार्षिक सदस्यत्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी शहरातील सर्व रिक्षाचालक-मालकांनी मोठ्या संख्येने संघटनेचे सदस्य होऊन संघटना अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
यावेळी बोलताना विक्की भुल्लर म्हणाले की, संघटना केवळ सदस्यत्वापुरती मर्यादित नसून प्रत्येक रिक्षाचालक-मालकाच्या हक्क, सन्मान आणि न्यायासाठी सातत्याने कार्यरत आहे. संघटना जितकी मजबूत असेल, तितक्याच प्रभावीपणे प्रशासन, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तसेच शासनासमोर रिक्षाचालक-मालकांच्या समस्या आणि विविध मागण्या मांडता येतील. त्यांनी सांगितले की, संघटनेचे सदस्य झालेल्या रिक्षाचालक-मालकांना शासन, आरटीओ आणि इतर विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, सामाजिक सुरक्षा, विमा योजना तसेच इतर आवश्यक सुविधा व मार्गदर्शनाची माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच संघटनेच्या बैठका, आंदोलने, कायदेशीर मार्गदर्शन आणि महत्त्वपूर्ण निर्णय प्रक्रियेत सदस्यांना सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
यावेळी हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी संघटनेच्या “चला मराठी शिकूया …. आओ मराठी सीखें!” या उपक्रमाचाही विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या अभिनव मोहिमेद्वारे सुमारे एक हजार रिक्षाचालक-मालकांनी मराठी भाषा शिकण्याचा संकल्प केला असून या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले आहे. या मोहिमेमुळे उल्हासनगर रिक्षा युनियनला महाराष्ट्रात एक वेगळी ओळख मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. संघटनेतील सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि रिक्षा स्टँड प्रमुखांनी आपल्या-आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक रिक्षाचालक-मालकापर्यंत सदस्यत्व अभियानाची माहिती पोहोचवावी, त्यांची सदस्य नोंदणी करून घ्यावी तसेच त्यांच्या समस्या संघटनेपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
संघटनेच्या वतीने सर्वाधिक सदस्य नोंदणी करणाऱ्या स्टँड प्रमुखाचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच संघटनेतील पुढील जबाबदाऱ्या आणि नेतृत्वाच्या संधी या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर आणि संघटन विस्तारातील योगदानाच्या आधारे दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले. वार्षिक सदस्यत्व नोंदणी राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या जनसंपर्क कार्यालय, आचल अपार्टमेंट, सी-ब्लॉक, उल्हासनगर-१ येथे दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
शेवटी अध्यक्ष हरजिंदरसिंह (विक्की) भुल्लर यांनी सर्व रिक्षाचालक-मालकांना मोठ्या संख्येने सदस्यत्व घेऊन संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. “आजचे सदस्यत्व म्हणजे उद्याच्या हक्कांची सर्वात मोठी ताकद आहे. मजबूत संघटनाच प्रत्येक रिक्षाचालक-मालकाच्या सन्मान, सुरक्षितता आणि उज्ज्वल भविष्यासाठी हमी ठरते,” असे ते म्हणाले.





























