अंबरनाथ दि. ४ ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ पूर्व येथील कोकण नगर परिसरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परिसरातील रहिवासी प्रतीक विसपुते यांचे घर अचानक खचून थेट लगतच्या नाल्यात कोसळल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी घरासह संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विसपुते कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले असून त्यांच्यासमोर आर्थिक आणि जगण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कोणताही विलंब न करता स्थानिक विभाग प्रमुख सचिन गुडेकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दुर्घटनाग्रस्त घराची पाहणी करून विसपुते कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच या कठीण प्रसंगी त्यांना धीर दिला. यावेळी आमदार डॉ. किणीकर यांनी अंबरनाथच्या तहसीलदारांशी थेट संपर्क साधून घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच शासनाच्या आपत्ती निवारण योजनेंतर्गत बाधित कुटुंबाला शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाला सूचना केल्या.

शासकीय मदतीची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी स्वतःच्या वतीने विसपुते कुटुंबाला वैयक्तिक आर्थिक मदतही प्रदान केली. या मदतीमुळे संकटग्रस्त कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्याबरोबरच या कठीण काळात समाजातील लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना निर्माण झाली. दरम्यान, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी विसपुते कुटुंबाला शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रशासनाच्या सतत संपर्कात राहणार असल्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी त्यांनी संकटाच्या काळात नागरिकांना धीर देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याचेही नमूद केले.





























