मुरबाड दि. १३ (सतिशचंद्र घरत) : कल्याण नगर महामार्गावर मुरबाड तालुक्यातील ऊमरोली ते मोरोशी पर्यंत रुंदीकरणाचे काम में महिन्यांपासून करण्यात येत आहे.मात्र रस्ता रुंदीकरणासाठी संपादीत करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा अर्ज विनंत्या करूनही मोबदला देण्यात टाळाटाळ करणाऱ्या सरकारला खडबडून जागे करण्यासाठी शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून तालुक्यातील टोकावडे नाक्यावर सोमवार दिनांक १४ जुलै रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असुन “मरु या जिंकु ” अशी भुमिका शेतकरी संघर्ष समितीने घेतली आहे.

नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्या आगोदर शेतकऱ्यांना शासकीय दराने मोबदला देण्यात येऊन काम सुरू करणे गरजेचे होते. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यासाठी संपादीत करण्यात येत आहेत त्यांना वाऱ्यावर सोडून कामं केले जात असल्याने, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा घरत , संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार सर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार,शेतकर्यांचे नेते रमेश हिंदुराव यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.





























