– कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा
– खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश
– पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी प्रवास होणार अधिक सुलभ
कल्याण दि. १ : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी या सेवेसाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, या निर्णयामुळे कोकणातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत भारतीय रेल्वेने या नवीन सेवेचा निर्णय घेतला असून, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत मंजुरी दिली आहे. या निर्णयाबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
कोकण रेल्वेवरील प्रवाशांची वाढती गर्दी, नवीन रेल्वे सेवेची आवश्यकता आणि मुंबई – कोकण दरम्यान अधिक सक्षम रेल्वे संपर्क निर्माण करण्याची गरज लक्षात घेऊन दोन्ही खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वेळोवेळी भेट घेत विविध मागण्या मांडल्या होत्या. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावर नवीन दैनिक रेल्वे सुरू करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली होती. या मागणीला तातडीने मंजुरी देण्यात आली असून, केंद्र सरकारकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.नवीन रेल्वे सेवा गाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावाने दररोज धावणार आहे. या गाडीचे सविस्तर वेळापत्रक भारतीय रेल्वेकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.सुमारे ५१० किलोमीटर अंतरावरील या मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणातील प्रमुख शहरांदरम्यान थेट, सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, व्यापार तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांना या नव्या सेवेचा मोठा लाभ होईल.
कोकण किनारपट्टीवरील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि निसर्ग पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असून, पर्यटन उद्योगाला नवी चालना मिळेल. त्याचबरोबर विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सेवा मोठी सोय ठरणार आहे. वाढलेली प्रवासी क्षमता, सुलभ वाहतूक आणि सुधारलेली कनेक्टिव्हिटी यामुळे कोकणातील स्थानिक अर्थव्यवस्था, उद्योग आणि व्यवसायालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नवीन दैनिक एक्सप्रेसचे प्रस्तावित थांबे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, वालिवाडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.





























