मुंबई दि.२८ : आर्यारवी एंटरटेनमेंटचा तिसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शिशुविकास हॉल,परेल येथे सिने-नाट्य क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सर्व विजेत्या लघुपटांचे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते, दिग्दर्शक प्रदीप कबरे, सही रे सही नाटक फेम विनोदी अभिनेते जयराज नायर, प्रसिद्ध उद्योजक, समाजसेवक, अभिनेते खलील शिरगांवकर, शिर्के प्रतिष्ठानचे अँड सुनिल शिर्के, जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटील, प्रसिद्ध विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, कांचन पगारे आदी मान्यवर यांच्या हस्ते सोहळ्याचे दीपप्रज्वलन करून काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली. आर्यारवी एंटरटेनमेंटचे महेश्वर तेटांबे यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अनिल सुतार, व अभिनेता सागर सातपुते यांच्या अस्खलित सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर सिनेसृष्टीत अलौकिक कार्य करणाऱ्या सर्वश्री अरुण होर्णेकर, मनोहर आचरेकर, निलांबरी खामकर, प्रदीप कबरे, लक्ष्मण गुरव आणि जयंत घाटे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच समाजभूषण, कलाभूषण, रंगकर्मी, समाजरत्न, युवा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. निवेदक अनिल सुतार आणि सागर सातपुते यांनी लघुपट स्पर्धेचा निकाल जाहीर केला.

या मध्ये कै.भिकाजी महादेव तेटांबे, कै.मनोरमा भिकाजी तेटांबे यांच्या स्मरणार्थ “शाश्वत” (प्रथम विजेता) रोख रक्कम २५ हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, लोकनेते कै.विठ्ठलदादा खाडे आणि कै. सुनीताताई विठ्ठलराव खाडे यांच्या स्मरणार्थ “शूलेस” (द्वितीय विजेता) रोख रक्कम १५ हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, “प्रपोजल” (तृतीय विजेता) रोख रक्कम १० हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह, “चटका” (उत्तेजनार्थ विजेता) रोख रक्कम ५ हजार,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच थर्ड आय प्रॉडक्शन्स निर्मित शिवा अय्यर प्रस्तुत महाराज आणि महात्मा या लघुपटाचे लेखन शिवा अय्यर आणि राम माळी तर दिग्दर्शन व अभिनेता राम माळी यांनी केले असून, महाराज आणि महात्मा लघुपटला उत्तेजनार्थ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर यांच्या हस्ते राम माळी आणि एडिटर तेजस यांनी पुरस्कार स्वीकारला तर उत्कृष्ट उत्तेजनार्थ अभिनेता महाराज या भूमिकेसाठी राम माळी यांना अभिनेते कांचन पगारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
अभिनेता सुरेश डाळे, निर्माते, दिग्दर्शक आनंद खाडे, अभिनेत्री लक्ष्मी मनिष गुप्ता, प्रसिद्ध अभिनेते रवी मोरे, बाळा चौकेकर, निलेश घाडी , राज जाधव यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. तर शिरोडकर हायस्कूल च्या १९८८ दुपार अधिवेशन च्या मित्रपरिवार यांनी (देवेंद्र पेडणेकर, अजीत साकरे सुरेश गुरव, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, विनायक हळदणकर आणि संदिप चव्हाण) कार्यक्रमाच्या मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या प्रसिद्ध निर्माते,दिग्दर्शक आनंद खाडे यांनी उपस्थित रसिक आणि मान्यवरांचे आभार मानले.





























