- १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घर, कार्यालये, कारखाने व शैक्षणिक संस्थांवर तिरंगा फडकविण्याचे आवाहन
उल्हासनगर दि. ११ ( प्रमोद दळवी ) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिक, संस्था, व्यक्ती तसेच उद्योगसमूहांना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सणानिमित्त् ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नागरिकांनी आपल्या घरांवर, कार्यालयांवर, कारखान्यांवर तसेच शालेय व इतर शैक्षणिक इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी केले आहे. राष्ट्रध्वज फडकविताना त्याची प्रतिष्ठा, सन्मान आणि पावित्र्य अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय ध्वज संहितेतील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रध्वज वापरताना घ्यावयाची काळजी
राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही. तसेच उशा, हातरुमाल, हातपुसणे किंवा अन्य पोशाख साहित्यावर राष्ट्रध्वजाची छपाई अथवा भरतकाम करता येणार नाही. राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेणे, देणे, बांधणे किंवा वाहून नेणे यासाठी साधन म्हणून वापर करता येणार नाही. तसेच वक्त्याचे टेबल झाकण्यासाठी किंवा व्यासपीठावर आच्छादन म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. राष्ट्रध्वजाचा जाणीवपूर्वक जमिनीशी किंवा पाण्याशी संपर्क होऊ देऊ नये. मोटार वाहन, रेल्वे, जहाज किंवा विमानाच्या छतावर, बाजूस अथवा मागील भागावर ध्वज आच्छादन म्हणून वापरू नये. तसेच कोणत्याही इमारतीचे आच्छादन म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करता येणार नाही. राष्ट्रध्वज फडकविताना केशरी रंगाचा पट्टा वरच्या बाजूस राहील याची काळजी घ्यावी. ध्वज फाटलेला किंवा चुरगळलेला नसावा. राष्ट्रध्वज इतर कोणत्याही ध्वजासोबत एकाच काठीवर फडकवू नये.
ध्वज लावण्याची योग्य पद्धत
ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल, त्या प्रत्येक ठिकाणी तो प्रतिष्ठा राखून आणि स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावला पाहिजे. मोकळ्या जागेत राष्ट्रध्वज शक्यतो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकविण्यात यावा. भिंतीवर राष्ट्रध्वज सपाट व आडवा लावल्यास केशरी रंगाचा पट्टा सर्वांत वर असावा. ध्वज उभा लावल्यास केशरी रंगाचा पट्टा ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा, म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस तो राहील.
राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्या वर अथवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. ज्या काठीवर राष्ट्रध्वज फडकविला जात आहे, त्या काठीवर किंवा तिच्या टोकावर फुले, हार, बोधचिन्ह अथवा अन्य कोणतीही वस्तू ठेवू नये. राष्ट्रध्वजाचा तोरण, गुच्छ, पताका किंवा केवळ सजावटीसाठी वापर करू नये. कागदी राष्ट्रध्वज राष्ट्रीय, सांस्कृतिक किंवा क्रीडा विषयक कार्यक्रमांमध्ये वापरता येतात; मात्र कार्यक्रम संपल्यानंतर ते ध्वज जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वज फाटेल अशा कोणत्याही पद्धतीने तो बांधू किंवा लावू नये.
देशभक्तीची भावना कृतीतून व्यक्त करण्याचे आवाहन
‘हर घर तिरंगा’ हा प्रत्येक नागरिकाच्या मनातील देशप्रेम आणि राष्ट्राबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एक अभिनव संधी आहे. या उपक्रमात उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपल्या घरांवर तसेच कार्यालयांमध्ये तिरंगा फडकवावा आणि देशभक्तीची भावना कृतीतून व्यक्त करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी केले आहे. ही माहिती उल्हासनगर महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून, जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.





























