उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या समता नगर, उल्हासनगर-४ येथील मॅनहोलमध्ये २९ जुलै २०२६ रोजी एका स्वच्छता कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून गटार साफसफाई करण्यात आल्याच्या घटनेविरोधात स्वराज्य संघटनेने महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर संबंधित ठिकाणी आता मशीनद्वारे मॅनहोलची साफसफाई सुरू करण्यात आल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

या घडामोडीनंतर मॅनहोल साफ करण्यासाठी आवश्यक यांत्रिक साधने उपलब्ध असूनही यापूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मॅनहोलमध्ये उतरवून साफसफाई करून घेण्यात येत होती, असा गंभीर आरोप स्वराज्य संघटनेने केला आहे. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी सांगितले की, “जर मशीन उपलब्ध होती, तर स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळण्याची गरजच नव्हती. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी कायद्याचे उल्लंघन करत गरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाला जाणीवपूर्वक धोका निर्माण केला आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” स्वराज्य संघटनेने नमूद केले की, ‘द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट अॅज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन ॲक्ट, २०१३’ अंतर्गत मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून साफसफाई करण्यास स्पष्टपणे प्रतिबंध आहे. अशा परिस्थितीत मशीन उपलब्ध असतानाही मानवी पद्धतीने साफसफाई करण्यात आली असल्यास, संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

या प्रकरणी स्वराज्य संघटनेने महापालिका आयुक्तांना नव्याने निवेदन सादर करून पुढील मागण्या केल्या आहेत : १) संबंधित अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी. २) संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी.३) भविष्यात कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला मॅनहोलमध्ये उतरविण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्व मॅनहोल व गटार साफसफाईची कामे केवळ यांत्रिक पद्धतीनेच करण्यात यावीत. स्वराज्य संघटनेने इशारा दिला आहे की, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर तातडीने कारवाई न झाल्यास संघटना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार आहे. गरीब स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड.. जय गायकवाड यांनी दिला.





























