ठाणे दि. ३१ : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागांतर्गत मेरा भारत ठाणे आणि नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान (स्वायत्त) महाविद्यालयात ‘नशा मुक्त युवा, विकसित भारतासाठी’ हा जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.

महाविद्यालयाच्या पतंजली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘चला मामाच्या गोव्याला जाऊ या’ या चित्रपटातील कलाकार अभिजित चव्हाण, संतोष जुवेकर आणि कुशल बद्रिके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर, मेरा भारत ठाण्याच्या जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा, कार्यक्रम सहाय्यक ज्योती रानी, समन्वयक सुनील गमरे, उपप्राचार्या प्रीती जांभुळकर, पर्यवेक्षक प्रा. बालाजी घुगे, कॅप्टन बिपीन धुमाळे, नाट्यदिग्दर्शक गोपी भोसले, सेवानिवृत्त प्रा. डॉ. प्रकाश माळी आणि प्रा. अनिल आठवले उपस्थित होते.

‘मतपरिवर्तनातून… व्यसनमुक्तीकडे’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, नुक्कड नाटक, परिसंवाद, काव्यवाचन, चित्रकला, घोषवाक्य लेखन आणि रील निर्मिती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून निरोगी व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. नशाबंदी मंडळाचे समन्वयक मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. स्पर्धांसाठी प्रा. प्रीती जांभुळकर, प्रा. बालाजी घुगे, प्रा. डॉ. प्रकाश माळी, प्रा. अनिल आठवले, प्रा. बिपीन धुमाळे, प्रा. विनोद थोरात, प्रा. प्रल्हाद वाघ, प्रा. नुपूर तळेले, प्रा. दर्शना चव्हाण, प्रा. रुपाली पाटील, गोपी भोसले, प्रा. सुभाष काळे, कांचन गायकवाड, प्रा. आशा शिरसाट, प्रा. योगिता पडवेकर, कु. आश्लेषा भोसले, प्रा. निकिता केणी आणि प्रा. पूजा कणसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
समारोप प्रसंगी प्राचार्या डॉ. विंदा मांज्रमकर, जिल्हा युवा अधिकारी मनिषा शर्मा आणि कार्यक्रम सहाय्यक ज्योती रानी यांच्या हस्ते सर्व परीक्षक तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांनाही प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅप्टन बिपीन धुमाळे यांनी केले.





























