उल्हासनगर दि.२० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर मधील फर्निचर मार्केट परिसरात माया हॉटेलच्या जवळ असलेल्या एका धोकादायक इमारतीच्या खिडकीचा सज्जा कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
मयत झालेल्या त्या मजुराचे नाव रावसाहेब असल्याचे बोलले जात आहे. उल्हासनगरातील माया हॉटेल जवळ एक जुनी इमारत असून त्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सायंकाळी चारच्या सुमारास रावसाहेब व काही मजूर त्या इमारती जवळ गल्लीमध्ये काम करत होते. त्यावेळी त्या इमारतीच्या वरील खिडकीचा सज्जा रावसाहेब यांच्या डोक्यावरून पडला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित उपचारासाठी उल्हासनगरतील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.





























