उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३ येथील हिराघाट परिसरात पार्क केलेल्या दोन वाहनांच्या काचा दगडाने फोडल्याची घटना सोमवारी घडली होती. या प्रकरणाचा तातडीने तपास करत मध्यवर्ती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटवून अवघ्या दीड तासात त्याला ताब्यात घेतले. परिसरात दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपीची दिंडही काढली.

हिराघाट परिसरात राहणारे संजय गुरुनानी यांनी त्यांची कार थायरासिंग दरबार रोडवर पार्क करून ठेवली होती. सोमवारी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दगड मारून त्यांच्या कारची काच फोडल्याचे निदर्शनास आले. याचवेळी शेजारी पार्क केलेल्या अन्य एका वाहनाचीही काच फोडण्यात आली होती. या घटनेची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला तातडीने वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर वैभव खरे या तरुणाला शहरातील सेक्शन २० परिसरातील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी आणि पोलीस निरीक्षक तुकाराम पादिर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब कोबारणे, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, चंदू शिंदे, कृपाल शेकडे, सुशांत हांडे देशमुख, प्रशांत धुडे आणि सुभाष सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव खरे याचे त्याच्या प्रियसीसोबत भांडण झाले होते. या वादामुळे संतापलेल्या खरेने रागाच्या भरात रस्त्यावर पार्क केलेल्या दोन्ही वाहनांच्या काचा दगडाने फोडल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची परिसरात दहशत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याची परिसरातून दिंड काढली. या प्रकरणाचा पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.दरम्यान, घटना घडल्यानंतर अवघ्या दीड तासात आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या तत्पर आणि प्रभावी कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.





























