उल्हासनगर दि. १८ ( प्रमोद दळवी ) : मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत ३ लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचा तब्बल २३८.५ ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेले आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्रीमती शितल बामणे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना दिल्या होत्या. सहायक पोलीस आयुक्त, अंबरनाथ विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोउनि बाळासाहेब कोबरणे, पोहवा जितेंद्र चैधरी, पोहवा सुभाष सुर्यवंषी, पोलीस शिपाई अनिल घुले, प्रशांत धुळे, पोलीस शिपाई समीर गायकवाड नेम हिललाईन पोलीस स्टेषन, पोलीस शिपाई बनगे नेम बदलापूर पूर्व, पोलीस शिपाई हरेश्वर चव्हाण नेम नि.कक्ष उल्हासनगर असे मध्यवर्ती पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे व पोलीस शिपाई समीर गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकिसन करोतीया नगर येथील गुलशन-ए-बगदाद मशिदीजवळ, उल्हासनगर-३ परिसरातील एका गाळ्यामध्ये एक व्यक्ती एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित व्यक्तीने तपकिरी रंगाचा फुल टी-शर्ट व निळ्या रंगाची हाफ बर्मुडा पॅन्ट परिधान केल्याचेही गुप्त बातमी मिळाल्याने ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी, सुभाष सूर्यवंशी तसेच पोलीस शिपाई अनिल घुले, प्रशांत धुळे, समीर गायकवाड, रोहित बनगे व हरेश्वर चव्हाण यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेहान मुख्तार अहमद शेख (वय ३८, रा. अशोकनगर, वालधुनी, कल्याण) आणि अरबाज मतिउर रहेमान खान (वय १९, रा. शिवगंगा अपार्टमेंट, उल्हासनगर-३) या दोघांना एम.डी. हा अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्या ताब्यातून सफेद रंगाचा २३८.५ ग्रॅम एम.डी. हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ३ लाख ३७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात शमशाद अहमद रियाज अहमद खान आणि आसिम खान हे दोघेही सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोघेही सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव, पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ सचिन गोरे, सहायक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग शंकर आवताडे तसेच सहायक पोलीस आयुक्त अंबरनाथ विभाग शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी व पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्रीमती शितल बामणे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी, सुभाष सूर्यवंशी तसेच पोलीस शिपाई अनिल घुले, प्रशांत धुळे, समीर गायकवाड, रोहित बनगे आणि हरेश्वर चव्हाण यांनी ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे करीत आहेत.





























