उल्हासनगर दि. २ ( प्रमोद दळवी ) : शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना आमदार बालाजी किणीकर, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि गटनेते अरुण आशान यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १३ च्या शिवसेना नगरसेविका सौ. कांताबाई विलास पवार, उद्योजक सुनील पवार आणि युवासेना शहरप्रमुख सुशील पवार यांच्या पुढाकाराने आरबीएल बँकेच्या सौजन्याने तीन दिवसीय मोफत आरोग्य शिबिर, नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

तीन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये कॅम्प क्रमांक ४ परिसरातील पाच पांडव कॉलनी, ब्राह्मण पाडा, संतोषीमाता कॉलनी, दत्तगुरू सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, दुर्गानगर, राहुलनगर, एकता चाळ, हनुमाननगर, हनुमान टेकडी, गणेश सोसायटी १ व २, संभाजी चौक आदी भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सीबीसी, रँडम ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल, टीएसएच, व्हिटॅमिन बी-१२ ), तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. याशिवाय आधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने नागरिकांची सविस्तर नेत्रतपासणी करण्यात आली. तपासणीनंतर गरजू लाभार्थ्यांना उच्च दर्जाचे चष्मे पूर्णपणे मोफत वितरित करण्यात आले.

या आरोग्य उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने त्यांनी आयोजकांचे आभार मानले. आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या शिबिराला शिवसेना उल्हासनगर महिला शहर संघटक मनीषा भानुषाली, नगरसेवक प्रदीप गोडसे, सुरेश सोनकांबळे, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना जाधव, अनिल मराठे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन भविष्यातही सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.





























