उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी ) : मैत्री दिनाचे औचित्य साधत शिवसेना नगरसेविका व महिला बालकल्याण समिती सभापती डॉ. मीना सोंडे आणि सोहम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅपी फ्रेंडशिप डे विथ नेचर” हा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम उल्हासनगर कॅम्प – ५ येथील डॉ. मीना सोंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या उपक्रमांतर्गत आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचविणाऱ्या आशा सेविकांच्या कार्याचा गौरव करत त्यांना १०० रेनकोटचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात प्रतिकूल परिस्थितीत घराघरांत जाऊन नागरिकांना आरोग्य सेवा देणाऱ्या आशा सेविकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ५० कडुलिंब (नीम) आणि बेलपत्र या औषधी व पर्यावरणपूरक वृक्षांच्या रोपांचेही वितरण करण्यात आले. उपस्थितांना वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना डॉ. मीना सोंडे म्हणाल्या, “दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाशी मैत्री जपण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आशा वर्कर या पाऊस, उन्हाची पर्वा न करता घराघरांत जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतात. त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांना आमचा सलाम आहे. त्यांच्या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना दर्जेदार रेनकोट देण्याचा निर्णय घेतला. “निसर्ग हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा मित्र आहे. आपण निसर्गाशी मैत्री केली तर तो आपल्याला निरोगी जीवन, शुद्ध हवा आणि समृद्ध पर्यावरण देतो. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, हीच खरी मैत्री दिनाची भेट ठरेल.” असे डॉ. मीना सोंडे म्हणाल्या

या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी, आरोग्य सेविकांप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला युवासेना शहर प्रमुख सुशील पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मोठ्या संख्येने आशा वर्कर महिला उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.”लव्ह नेचर – नेचर इज अवर ग्रेट फ्रेंड” हा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.





























