ठाणे दि. २६ ( प्रमोद दळवी ) : ज्ञानगंगा शिक्षण संकुल, कासारवडवली येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्सच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तसेच कासारवडवली पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीमध्ये NSS स्वयंसेवक, विद्यार्थी, प्राध्यापक व पोलीस अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याबाबत जनजागृती करणारे फलक हातात घेऊन परिसरात रॅली काढली. तसेच “व्यसनमुक्त भारत – सुदृढ भारत”, “अंमली पदार्थांना नकार द्या, उज्ज्वल भविष्य स्वीकारा” यांसारख्या घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.
रॅलीचा उद्देश युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाविषयी जागरूकता निर्माण करणे, बेकायदेशीर अंमली पदार्थ तस्करीविरोधात जनमत तयार करणे तसेच निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीचा संदेश देणे हा होता.या उपक्रमाद्वारे समाजात अंमली पदार्थमुक्त वातावरण निर्माण करण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थी व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरक्षित, निरोगी आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


























