अंबरनाथ दि.४ ( प्रमोद दळवी ) : अचानक दुपारच्या सुमारास मठामध्ये एका सापाने एन्ट्री केल्याने भक्तगणांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण काही वेळातच सर्व भक्तगणांनी मोठ्या मनोभावनेने आणि श्रद्धेने त्या सापाची पूजा केल्याची घटना अंबरनाथ मधील स्वामी समर्थ महाराज मठात घडली.
याबाबत सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी माहिती माहिती दिली. अंबरनाथ मधील स्वामी समर्थ चौकात स्वामी समर्थ महाराज मठ आहे. या मठात दुपारी दोनच्या सुमारास भक्तगण उपस्थित असताना अचानक एका सापाने मठात एन्ट्री केली. त्या सापाला पाहून सर्वप्रथम भक्तगण घाबरले. त्यांनी त्वरित सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना या सापाची माहिती दिली. प्रकाश गोहिल यांनी त्वरित मठाकडे धाव घेत त्या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो साप मठात सैरावैरा पळू लागला. काही वेळातच प्रकाश गोहिल यांनी त्या सापाला पकडून प्लास्टिकच्या बाटलीत ठेवले. त्या सापाची पाहणी केली असता तो दोन फुटी लांबीचा विषारी कोब्रा साप होता.
सध्या अति उष्णतेमुळे तो साप थंड जागेचे ठिकाण शोधण्यासाठी त्या मठात शिरला असावा असे गोहिल यांनी सांगितले. पकडण्यात आलेला साप हा विषारी कोब्रा जातीचा नाग आहे. हा नाग मठात शिरल्यामुळे उपस्थित भाविकांनी त्या नागाची पूजा करण्याची ठरवले. सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी त्या सापाला पकडून एका प्लास्टिकच्या मोठ्या बाटलीत ठेवले होते. ती बाटली त्यांनी भाविकांसमोर ठेवली. मठामध्ये साप शिरल्याने सर्वप्रथम भाविकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते पण त्यानंतर सर्वांच्या मनातली भीती दूर होऊन त्यांनी भक्तीभावनेने हर हर महादेव म्हणत त्या नागराजाची पूजा केली. मठात सापाने एन्ट्री केल्यामुळे भक्तगणांमध्ये आनंदाचे वातावरण ही पाहायला मिळाले.त्यानंतर सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी त्या विषारी नागाला जंगलाच्या ठिकाणी जाऊन सोडले.





























