अंबरनाथ दि.१२ ( प्रमोद दळवी ): अंबरनाथ आयटीआय समोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्पीडब्रेकरवर वेगाने जात असताना दुचाकी अनियंत्रित होऊन जोरात आढळल्याने हा अपघात झाला. मृतांची नावे आणि प्रणय गोरीवाले अशी असून दोघेही मुरलीधर नगर परिसरातील रहिवासी होते.
कल्याण बदलापूर राज्य महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैध स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. या स्पीड ब्रेकर वर पांढरेपट्टे मारण्यात न आल्यामुळे तसेच या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधुक प्रकाश असल्यामुळे हे स्पीड ब्रेकर अनेक वाहन चालकांना पटकन दिसून येत नाही. त्यामुळे अनेक गाड्या भरधाव वेगात येऊन स्पीडब्रेकर वरून उडत असतात. अशातच शनिवारी रात्री २३ वर्षीय पवन आणि १७ वर्षीय प्रणय गोरीवाले हे दोन तरुण दुचाकीवरून उल्हासनगर कडे जात असताना त्यांनाही हा स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे वेगात असलेली त्यांची गाडी अनियंत्रित होऊन त्यांचा अपघात झाला. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी अवैध्य स्पीड ब्रेकर उभारण्या विरोधात पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी या दोघांच्या नातेवाईकांनी केली आहे. या दोघांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता. मात्र रुग्णवाहिका वेळेत आली नाही आणि पोलिसांनी त्यांना खाजगी वाहनाने रुग्णालयात नेऊ दिले नाही असा आरोप नातेवाईकांनी केली आहे.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान अंबरनाथ आणि रिलायन्स पेट्रोल पंप यांच्या दरम्यान असलेल्या स्पीड ब्रेकर रात्री नीट दिसत नसल्याने त्या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याबाबत स्थानिकांनी आधी अनेक तक्रारी केल्या होत्या. या घटनेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी स्पीडब्रेकरचा पर्याय बदलण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.





























