उल्हासनगर, दि. ७ ( प्रमोद दळवी ) : शहरात आज सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शासनाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत झाडे कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे तसेच इतर आपत्कालीन घटनांची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. अनेक ठिकाणी पडलेली झाडे हटविणे, धोकादायक फांद्या बाजूला करणे, वीजवाहिन्यांवरील अडथळे दूर करणे तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.दरम्यान, वालधोनी नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदीकाठील सखल भागांतील काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी संबंधित परिसरांना भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बाधित नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तसेच महानगरपालिका आणि प्रशासनाच्या सर्व यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास दिला. आवश्यकतेनुसार तातडीने मदत व बचावकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून घरांवरील पत्र्यांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी तहसीलदार कार्यालयामार्फत पंचनामे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे व युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून पात्र नागरिकांना शासनाची मदत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशीही त्यांनी विनंती केली.यावेळी नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात कोणताही धोका पत्करू नये, तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून, ओढ्यांपासून तसेच धोकादायक झाडे व वीजवाहिन्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. कुठेही झाड पडण्याचा धोका, वीजवाहिन्यांवर झाडे, पाणी साचणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच सर्व संबंधित यंत्रणा २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज असून प्रत्येक तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
“नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही धोका पत्करू नका. तुडुंब भरून वाहणाऱ्या नदी-नाल्यांपासून सुरक्षित अंतर राखा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्या. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणा आपल्या मदतीसाठी २४ तास सज्ज आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन युवा समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केले.





























