उल्हासनगर दि २७ ( प्रमोद दळवी ) : लोकसभेत महिला आरक्षणासंदर्भातील परीसिमन विधेयक काँग्रेसच्या विरोधामुळे मंजूर झाले नसल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा व महिला आघाडीच्या वतीने उल्हासनगरातील कॅम्प -३ येथील नेहरू चौकात महिलांचा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दुपारी अकरा वाजता झालेल्या या आंदोलनात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप काँग्रेस वर करत तीव्र निषेध व्यक्त केला. महिला सक्षमीकरणासाठी आरक्षण महत्त्वाचा असून ते तातडीने लागू करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली.
या ‘जनआक्रोश आंदोलन’ अंतर्गत आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान वातावरण चांगलेच तापले होते आणि कार्यकर्त्यांनी सरकारच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांच्या निषेधार्थ जोरदार आवाज उठवला. या आंदोलनात युवा मोर्चा अध्यक्ष गुरुदीपसिंग लबाना, महिला मोर्चा अध्यक्ष मंगला चांडा, नगरसेविका मीना कौर लबाना तसेच संध्या मराठे, भरती शर्मा, वैशाली शिरसाट, भूमी शर्मा, पुनम कळसकर, रेखा पवार, सीमा जाधव, सोनाली साठे, स्नेहा चुग, हर्षद चावला आणि ज्योती खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























