- तब्बल दहा तासाच्या प्रयत्नानंतर रात्री दोन वाजता मगरीला पकडण्यात यश
- वनविभाग,अश्वमेध प्रतिष्ठान व रॉ रेस्क्यू टीमचे नागरिकांनी मानले आभार
मुरबाड दि.७ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन वर्षापासून त्या मगरीने गावातील व खेड्यापाड्यातील नागरिकांची झोप उडवली होती. त्या तलावात ती अधून मधून दिसत असल्याने नागरिक खूपच भयभीत झाले होते. वनविभागा सह अश्वमेध प्रतिष्ठान व रॉ रेस्क्यू टीम गेल्या दोन वर्षापासून त्या मगरीचा शोध घेत त्या ठिकाणी सापळा लावून होते . पण त्या सापळ्यात ती मगर अडकत नव्हती. अनेक वेळा तिन्ही चुकांडीही दिली. अखेर ती रविवारी पुन्हा दिसताच तब्बल दहा तासाच्या प्रयत्नानंतर त्या मगरीला वनविभाग, अश्वमेध प्रतिष्ठान, रॉ रेस्क्यू टीम, व गावातील काही नागरिकांच्या मदतीने पकडण्यात यश आले आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मनातील मगरी विषय असलेली भीती दूर झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामधील मासले बेलपाडा गावाजवळील सुमारे साडेसहा एकर एवढ्या मोठ्या विस्तृत क्षेत्र असलेल्या तलावात गेल्या दोन वर्षापासून एक मगर फिरत असल्याची चर्चा गावातील व खेड्यापाड्यातील नागरिकांमध्ये सुरू होते. त्यात काही नागरिकांनी त्या मगरीला फिरतानाही तलावात पाहिले होते. या मगरी विषय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आले होते. या भल्या मोठ्या तालावातून त्या मगरीचा शोध घेणे वन विभागाच्या पुढे एक आव्हान निर्माण झाले होते. गावातील व खेड्यापाड्यातील नागरिकांमध्ये या मगरीबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच काय दिवसाही त्यात तलावाच्या परिसरात कोणीही फिरकत नव्हते. इतकी दहशत त्या मगरीची निर्माण झाली होती. त्यामुळे त्या तलावातून मगरीचा शोध घेऊन तिला पकडण्यासाठी वन विभागासह, अश्वमेध प्रतिष्ठान, रॉ रेस्क्यू टीम, व गावातील काही नागरिकांच्या मदतीने त्या तलावाच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून त्या मगरीवर पाळत होती. दोन वर्षात ती अनेक वेळा तलावात दिसली सुद्धा. पण ती चुकांड्या देऊन प्रसार होत होती. त्या तलावाजवळ दिवस रात्र वन विभागाने सापळाही लावला होता. पण त्या सापळ्यात ती सापडत नव्हती. त्या तलावातून मगरील सुरक्षित पकडणे हा एकच उद्देश वन विभागाने मनात ठेवला होता.

अखेर रविवारी सकाळी ११ वाजता रॉ रेस्क्यू टीमच्या व अश्वमेघ प्रतिष्ठानच्या पथकाला ही मगर तलावाच्या ठिकाणी असलेल्या एका हौदात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली. मुरबाड पश्चिम वनक्षेत्र अधिकारी संजूदास राठोड, मुरबाड पूर्व वनक्षेत्र अधिकारी महेश शिंदे, वन क्षेत्रपाल कपिल पवार, मुरबाड सहाय्यक वनरक्षक तुषार काळभोर, कोळा वनपाल सुनील वाडेकर, बेलपाडा वनरक्षक योगेश देशमुख, कोळा वनरक्षक सुरज मातोळे, घोरले वनरक्षक दीपक पतंगराव, मासले वनरक्षक राजेंद्र खाडे, लेखापाल ठाणे वन विभाग अनिल बांगर, वन मजूर धर्मा खुणे, सोमा शिंदे, गोपाळ काढाळी, भगवान निरगुडा, अनंता घोडविंदे, मानद वन्यजीवन रक्षक अविनाश हरड, अश्वमेध प्रतिष्ठानचे प्रकाश भुसारी, व रॉ रेस्क्यू टीमचे पथक यांनी त्या मगरीला हौदातून पकडण्याचा प्रयत्न सुरू केला.

त्या हौदात पाणी असल्यामुळे ती लपून बसली होती. दोन पंपाच्या साहाय्याने हौदातील पाणी काढून त्या मगरीचा शोध सुरू केला. तब्बल दहा तास हा प्रयत्न सुरू होता. अखेर मध्यरात्री दोनच्या सुमारास मोठ्या जाळीच्या साह्याने हौदातून त्या मगरीला त्या सर्व पथकांनी सुरक्षित पकडून बाहेर आणली. ती मगर सुमारे ६ फूट लांबीची असून गेल्या दोन वर्षापासून त्या तलावात ती फिरत होती. तलावात फिरणाऱ्या त्या मगरीला वनविभागाने पकडल्याने मध्यरात्रीच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. मगरीला पकडल्यामुळे आता गावातील व खेड्यापाड्यातील नागरिकांच्या मनातली भीती दूर झाली आहे. ग्रामसेवक विलास मिरकुटे यांनी वनविभागासह अश्वमेध प्रतिष्ठान व रॉ रेस्क्यू टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे. याशिवाय वन्यजीवांचे संरक्षण आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करत असलेल्या या धाडसी कामगिरीचे कौतुक केले आहे.

पकडण्यात आलेल्या त्या मगरीला वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत रवानगी करण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारांती मगर वन्यप्राणी तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. ही मगर मासले बेल पाडा गावाजवळील तलावात आली कशी, त्या तलावात आणखीन काही मगरी आहेत का असाही प्रश्न निर्माण झाला आहे..





























