उल्हासनगर, दि. २१ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने चार नवीन अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना अत्यल्प दरात, जलद, सुरक्षित आणि सुलभ ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार असून, आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार आहे.

खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी आमदार पप्पू कलानी यांनी निवडणुकीपूर्वी उल्हासनगरकरांना दिलेले आश्वासन आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे यांनी प्रत्यक्षात पूर्ण करत ही महत्त्वपूर्ण सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली. या लोकार्पण सोहळ्याला महापौर अश्विनी कमलेश निकम, स्थायी समिती सभापती कुलवंत सिंग सोहता (बिट्टू भाई), आरोग्य सभापती सविता तोरणे रगडे, गटनेते राजेश वधारीया, शिक्षण सभापती साक्षी सुर्वे, प्रभाग समिती सभापती संगीता सपकाळे, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप गायकवाड, जमनू पुरस्वानी, महेश सुखरामानी, टोनी शिरवानी, शेरी लुंड यांच्यासह महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन ॲम्ब्युलन्स सेवेमुळे अपघात, गंभीर आजार किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत होणार आहे. अत्यल्प दरात उपलब्ध होणाऱ्या या सेवेमुळे सर्वसामान्य नागरिकांवरील आर्थिक भारही कमी होणार असून, शहरातील आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान आणि प्रभावी होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी सांगितले की, उल्हासनगरच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका सातत्याने विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश असून, चार नवीन ॲम्ब्युलन्सची भर पडल्याने शहरातील आपत्कालीन आरोग्य सेवेला मोठे बळ मिळणार आहे. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले असून, शहराच्या आरोग्य सुविधांच्या उन्नतीच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.





























