उल्हासनगर दि. २५ ( प्रमोद दळवी ) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त उल्हासनगर येथील प्रसिद्ध बिर्ला मंदिर (श्री विठोबा-रुक्मिणी मंदिर) येथे शुक्रवारी पहाटे भक्तिमय वातावरणात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत श्री विठोबा-रुक्मिणींचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.

या प्रसंगी उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, प्रख्यात उद्योजक महेश अग्रवाल तसेच उद्धव रूपचंदानी परिवार यांनी श्री विठोबा-रुक्मिणींची विधिवत पूजा-अर्चा करून महाआरती केली. यावेळी राज्यातील तसेच शहरातील नागरिकांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. भजन-कीर्तन, मंत्रोच्चार आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. विविध भागांतून आलेल्या भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाआरतीदरम्यान मंदिर परिसरात उत्साहाचे आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार कुमार आयलानी यांनी सर्व नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आषाढी एकादशी हा श्रद्धा, सेवा, भक्ती आणि सामाजिक सद्भावनेचा संदेश देणारा पवित्र सण आहे. भगवान श्री विठोबांच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना आहे.” महाआरतीनंतर मंदिरात उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.





























