- रहिवाशांमध्ये घबराट
- विद्युत वाहिनीचा लोखंडी खांब कोसळण्याची शक्यता
- महावितरण आणि पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेण्याची मागणी
बदलापूर दि २० ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याशिवाय या मुसळधार पावसात प्रचंड वेगाने वारेही वाहत असल्यामुळे बदलापूर गाव येथील चिंतामणी चौकातील मंजिरी हाईट्स या गृह संकुलाची संरक्षण भिंत रात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.

कोसळलेल्या संरक्षण भिंतीला लागूनच मोठा नाला असल्याने ती संरक्षण भिंत कमकुवत झाली होती. त्यामुळे मुसळधार पावसात रात्रीच्या सुमारास ती संरक्षण भिंत अचानक कोसळली. मात्र कोसळलेल्या संरक्षण भिंतीचा पुढचा भाग अजूनही कोसळण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी महावितरणचा एक उच्च दाबाची विद्युत वाहिनीचा ही लोखंडी खांब धोकादायक स्थितीत असून तोही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या धोकादायक स्थितीत झालेल्या विद्युत पोलमुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. मंजिरी हाईट्स या गृह संकुलातील रहिवाशांनी पालिका प्रशासन आणि महावितरणाला हा धोका लक्षात आणून देत पत्रव्यवहार देखील केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर दुर्घटना होण्याआधी प्रशासनाने त्याची दखल घ्यावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे





























