उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, टायफॉईड यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन उल्हासनगर महानगरपालिका आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. माजी आमदार श्री. पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.
उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्राथमिक आरोग्य केंद्रे, ‘आपला दवाखाना’ तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यवर्धिनी केंद्रे अशी एकूण ५५ आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांची सद्यस्थिती, रुग्णसंख्या, तपासण्या, उपचार तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

३० संशयित डेंग्यू रुग्णांवर उपचार; सर्व रुग्ण बरे
बैठकीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यापर्यंत उल्हासनगर शहरात डेंग्यूचे ३० संशयित रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाने तातडीने आवश्यक तपासण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्याने हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे सध्या शहरात एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या कामगिरीबद्दल आरोग्य विभागाचे कौतुक करण्यात आले. मात्र पावसाळ्याचा कालावधी अद्याप सुरू असल्याने आगामी काळात साथीचे आजार वाढू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, अशा स्पष्ट सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वॉर्डनिहाय उपाययोजनांवर भर
प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रात वॉर्डनिहाय आरोग्यविषयक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात. स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने नागरिकांमध्ये जनजागृती करावी, डेंग्यू-मलेरिया यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, तसेच संशयित रुग्णांची वेळेत तपासणी व उपचार करावेत, अशा सूचना देण्यात आल्या. नागरिकांनी घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे आणि ताप किंवा इतर लक्षणे जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घेणे, याबाबतही जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर आरोग्यसेवेचे महत्त्व
माजी आमदार श्री. पप्पू कलानी यांनी आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले. दिल्लीतील ‘मोहल्ला क्लिनिक’च्या धर्तीवर नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उल्हासनगर महानगरपालिकेची आरोग्य केंद्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना अधिक चांगल्या, तत्पर आणि सहज उपलब्ध आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवाजी रगडे तसेच नगरसेविका सीमा कलानी यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही
आरोग्य सभापती सौ. सविता तोरणे रगडे यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामात कोणत्याही प्रकारची हयगय किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रत्येक आरोग्य केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रात सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना, रुग्णांची तपासणी, जनजागृती आणि आवश्यक उपचार यावर विशेष भर द्यावा. पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज
उल्हासनगर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या शहरात एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची स्थिती कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. दरम्यान नागरिकांनीही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सहकार्य करून आपल्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी आणि आजाराची लक्षणे दिसून आल्यास विलंब न करता आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





























