उल्हासनगर दि.१४ : उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत मंगळवारी दुपारी १२:०० वाजता महापालिका प्रशासक तथा आयुक्त (भा.प्र.से. ) श्रीम. मनिषा आव्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थायी समिती सभागृहात अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष. चरणसिंह टांक, लेबर फ्रंट संघटनाचे. श्याम गायकवाड, दीपक दाभणे, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे, मनसे युनियनचे अध्यक्ष दिलीप थोरात यांची बैठक घेण्यात आली.

बैठकीत सर्व युनियनच्या संमतीने उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना ऐकरक्कमी १८ हजार दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याचे आयुक्तांनी मंगळवारी जाहीर केले. याबाबत सर्व युनियनच्या अध्यक्षांनी मा. प्रशासक तथा आयुक्त यांचे आभार व्यक्त केले. आयुक्तांच्या निर्णयानंतर महापालिकेतील कर्मचारी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यामुळे महापालिकेवर साडे तीन कोटींचा जादाचा आर्थिक भार पडणार आहे. दिवाळी सानुग्रह अनुदानाचा लाभ महापालिकेतील एकून २ हजार कामगाराना मिळणार आहे. दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात दिवाळी बोनस रक्कमेसह वेतन देण्याचा मानस मुख्य लेखा अधिकारी भिल्लारे यांनी व्यक्त केला. सदर बैठकीत अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपआयुक्त (मुख्यालय) श्रीम. दीपाली चौगले, मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे, सहा. आयुक्त (साप्रवि) श्रीम. सलोनी निवकर व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.





























