उल्हासनगर दि. १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील मुद्रांक शुल्काशी संबंधित १,२७२ प्रलंबित प्रकरणांबाबत आज महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उल्हासनगरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश महसूल मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उल्हासनगरातील नागरिकांना प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, ही योजना पुन्हा लागू करण्यात यावी, अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. आमदार आयलानी यांच्या या मागणीची दखल घेत महसूल मंत्र्यांनी आजच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला. बैठकीदरम्यान उल्हासनगरातील १,२७२ प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना जलद आणि सुलभ दिलासा मिळावा, यासाठी मुद्रांक शुल्क अभय योजना लागू करण्याची प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या निर्णयामुळे उल्हासनगरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्रांक शुल्काशी संबंधित प्रकरणांच्या निकाली काढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या ऑनलाइन बैठकीस आमदार कुमार आयलानी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव, महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक नियंत्रक (आयजीआर), पुणे, सह जिल्हा निबंधक (जेडीआर), ठाणे ग्रामीण तसेच महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





























