उल्हासनगर दि. १४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर तिरंगा २०२६’ मोहिमेअंतर्गत शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधू भवन, उल्हासनगर-२ येथे ‘फाळणी दिवस प्रदर्शन व कँडल मार्च’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश फाळणीच्या काळातील वेदनादायी घटना, नागरिकांचे विस्थापन, त्याग आणि संघर्ष यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा होता.

सिंधू भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या फाळणी दिवस प्रदर्शनाला १८ शाळांमधील एकूण ५८८ विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी भेट दिली. प्रदर्शनामध्ये फाळणीच्या काळातील ऐतिहासिक घटना, छायाचित्रे आणि विविध माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देत इतिहासातील या अत्यंत वेदनादायी पर्वाची माहिती जाणून घेतली. या उपक्रमासाठी कार्यक्रमाला साजेशी आकर्षक रांगोळी सुरक्षा अधिकारी दशरथ जयस्वाल यांनी साकारली. त्यांच्या या कलाकृतीने कार्यक्रमस्थळी विशेष वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सायंकाळी फाळणीदरम्यान प्राण गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून फाळणीतील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. कँडल मार्चच्या माध्यमातून फाळणीतील हुतात्मा नागरिकांच्या स्मृतींना उजाळा देत शांतता, एकता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला.

या कँडल मार्चमध्ये क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापती श्रीमती प्रीती विनोद माखीजा, उपायुक्त (जनसंपर्क) श्रीमती स्नेहा करपे, जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी, सहायक आयुक्त गणेश शिंपी, विनोद माखीजा, तसेच बचत गटातील महिला आणि महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. फाळणी दिवस प्रदर्शन आणि कँडल मार्चच्या माध्यमातून इतिहासातील या वेदनादायी पर्वाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मता, शांतता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमाची माहिती उल्हासनगर महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.





























