ठाणे दि.१५ : १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टतर्फे दत्तक घेतलेल्या ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक ५९, पानखंडा येथे बी.एड. आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून मोबाईलचा गैरवापर, वेळेचे व्यवस्थापन आणि योग्य आहाराचे महत्त्व याबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली. पथनाट्याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आनंदाने अनुभवले. याशिवाय बी.एड.च्या विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांचे हातांचे ठसे घेऊन एक आकर्षक रंगसंगती साकारली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेबद्दलची आवड वाढीस लागली.

हा कार्यक्रम ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका डॉ. अनिता अमित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रा. अनिल आठवले (PRO), प्रा. प्रतिभा कांबळी, प्रा. सुरभी सोना , नर्सिंग विभागाचे प्रा. राकेश कांबळे, तसेच पानखंडा शाळेतील शिक्षिका उषा भोये आणि डोंगरे सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमामध्ये ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.





























