- उल्हासनगर व डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोडविल्या शेकडो नागरिकांच्या समस्या
- थेट संवादातून नागरिकांच्या अडचणी जाणून घेत तातडीने कार्यवाहीच्या सूचना; अनेक प्रलंबित प्रश्नांना मिळाला मार्ग
उल्हासनगर दि २२ : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या उद्देशाने उल्हासनगर आणि डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध नागरी समस्या, प्रलंबित कामे आणि प्रशासनाशी संबंधित अडचणी मांडल्या. या उपक्रमाअंतर्गत उल्हासनगर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, महापालिका कामकाजाशी संबंधित अडचणी तसेच विविध शासकीय कामांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदने सादर केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या सविस्तर ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या.

डोंबिवली येथे ही शिवसेना मध्यवर्ती शाखेतही “खासदार आपल्या भेटीला – जनता दरबार” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या विविध समस्या मांडल्या. खासदार डॉ. शिंदे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांशी समन्वय साधून त्या समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

नागरिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि प्रशासनानेही त्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने व तत्परतेने निर्णय घ्यावेत, या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना मार्ग मिळत असून प्रशासन आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद निर्माण होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट खासदारांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळत असून प्रशासनालाही त्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यास गती मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

डोंबिवली येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर उल्हासनगर येथे झालेल्या जनता दरबारावेळी नागरिकांच्या विविध समस्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऐकून घेतल्या व त्यावर तात्काळ उपयोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी शहरातील विकास कामांवर सविस्तर आढावा घेण्यात आला.त्यावेळी शिवसेना गटनेते व नगरसेवक अरुण आशान, शिवसेना महानगरप्रमुख व नगरसेवक, राजेंद्र चौधरी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





























