उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून सभास्थळाचे ‘गंगाजलाने शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र निषेध केला. खरगे यांच्या उपस्थितीमुळे सभास्थळ अपवित्र झाले, या मानसिकतेतून करण्यात आलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय असून, हा प्रकार केवळ एका राष्ट्रीय नेत्याचा अपमान नसून भारतीय संविधानाने दिलेल्या समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांवर झालेला आघात आहे, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार या घटनेचा निषेध करण्यासाठी उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शांततापूर्ण निषेध मोर्चा व सत्याग्रह आंदोलन आयोजित करण्यात आले होते. उल्हासनगर-४ येथील आंबेडकर चौक, सुभाष टेकडी परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जातीयवाद व मनुवादी विचारसरणीविरोधात जोरदार घोषणा देत संबंधित घटनेचा निषेध केला. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.
आंदोलनादरम्यान उपस्थित काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देते. कोणत्याही व्यक्तीच्या जात, धर्म किंवा सामाजिक पार्श्वभूमीवरून एखाद्या ठिकाणाचे ‘शुद्धीकरण’ करण्याची मानसिकता ही सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांना बाधक आहे. अशा भेदभावपूर्ण प्रवृत्तींना लोकशाही भारतात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या निषेध आंदोलनाला उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किशोर धडके, महादेव शेलार, विरोधी पक्षनेत्या अंजली साळवे, ब्लॉक अध्यक्ष विशाल सोनवणे, पवन मिरणी, अनिल यादव, विकी आहुजा, जिल्हा उपाध्यक्ष राजेश फक्के, मालती गवई, कालिंदी गवई, विजय गाडे, अन्सार शेख, आबा साठे, राहुल कोजगे, आतिश जाधव, हनी मिरानी तसेच समाजसेवक रजनीकांत गायकवाड, दिगंबर हजारे, माला मोरे, लता पडघम यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























