उल्हासनगर दि.१९ ( प्रमोद दळवी ) : कोल्ड्रिंक, चहा, कॉफी व पेढ्यामध्ये गुंगीचे औषध मिसळून नागरिकांना बेशुद्ध करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व रोख रक्कम लुटणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्या दोन जणांकडून चोरी केलेली सोन्याची चेन हस्तगत केली आहे
मिळालेल्या माहितीनुसार सुमारे एक महिन्यापूर्वी बदलापूर मधील रहिवासी तानाजी हे उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील वीनस चौकात आले होते.त्यावेळी दोन अज्ञात इस्मानी त्यांना कोल्ड्रिंक मध्ये गुंगीच्या औषध मिसळून त्यांना पाजले होते. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यावेळी त्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व काही रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोटान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस करीत होते . पोलीस उपनिरीक्षक बंकट स्वामी दराडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास मिसाळ, हेड कॉन्स्टेबल दिलीप चव्हाण, संतोष सांगळे, राठोड, चंदू गायकवाड व मोरे या टीमने. ज्या ठिकाणी चोरीची घटना घडली होती त्या ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. याशिवाय तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी गुप्त माहिती काढून नितीन सुर्वे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या चोरीच्या गुन्ह्यात आपला सहकारी सतीश कंनगिरी याच्यासोबत मिळून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. सतीश हा अहमदाबाद इथला राहणार असल्याचे पोलिसांना समजले. याशिवाय नितीन याने कोल्ड्रिंक चहा कॉफीमध्ये गुंगीचे पदार्थ टाकून लुटमारी करीत असल्याचे देखील पोलिसांना सांगितले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नितीन व सतीश या दोघांनाही अटक केली असून त्यांच्याकडून १६ ग्राम वजनाची सोन्याची चेन हस्तगत केली आहे.पोलिसांनी केलेल्या तपासात ताब्यात घेतलेला आरोपी नितीन हा एक हिस्ट्री सीटर गुन्हेगार असल्याचे समजले आहे. तो आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कोल्ड्रिंक चहा व कॉफीमध्ये तसेच मिठाई मध्ये गुंगीच्या औषध मिसळून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व कल्याण परिसरात त्याने बरेच गुन्हे केले असल्याचे समजले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईतील नवघर, मुलुंड, व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन मध्ये देखील विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समजले आहे. त्यांच्या विरुद्ध जवळपास चार गुन्हे दाखल असून ते गुन्हे देखील त्यांनी अशाच पद्धतीने केले असल्याचे तपासा समजले आहे. या दोन चोट्यांकडून विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन गुन्हे उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे. यांनी आणखीन काही अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत का याचा अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत





























