उल्हासनगर दि .२९ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार आयलानी यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांची विधान भवनात सदिच्छा भेट घेतली आणि उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास व जनकल्याणाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान आमदार आयलानी यांनी उल्हासनगरच्या विकासकामांना गती देण्यासाठी विविध योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. विशेषतः अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच अंटेलिया संकुलात आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी केली
याव्यतिरिक्त शहरातील पायाभूत सुविधांचा विकास, क्रीडा सुविधांचा विस्तार आणि नागरिकांना अधिक चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भातही सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांनी आमदार आयलानी यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्य सरकारच्या सहकार्यामुळे उल्हासनगरमधील विकासकामांना नवी गती मिळेल आणि विविध विकास योजनांचा थेट लाभ शहरातील नागरिकांना होईल, असा विश्वास आमदार कुमार आयलानी यांनी यावेळी व्यक्त केला.





























