उल्हासनगर दि. ७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर-3 परिसरातील मयूर हॉटेल ते सेंट्रल हॉस्पिटल दरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट नियोजनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता तयार करताना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल याची पुरेशी काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मंगळवारी या रस्त्यावरील उघड्या व अर्धवट अवस्थेतील नाल्यात एक शाळकरी मुलगा पडून पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्याची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

या मार्गावर सेवा सदन महाविद्यालय तसेच शासकीय तंत्रविद्यालय असल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. मात्र रस्त्याचे काम करताना रस्ता छोटा आणि फुटपाथ मोठे करण्यात आल्याचा आरोप होत आहे. तसेच रस्त्याची पातळी खाली आणि नाल्याची पातळी उंच राहिल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी हा प्रश्न वारंवार उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला होता. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. सध्या प्रत्येक पावसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. संबंधित रस्त्याचे तांत्रिक परीक्षण करून पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अर्धवट फुटपाथ व उघडे नाले तातडीने सुरक्षित करावेत आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.





























