उल्हासनगर, दि. ६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी आज अतिवृष्टीमुळे प्रभावित व नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात उपायुक्त श्रीमती स्नेहा करपे, सहाय्यक आयुक्त श्री. विशाल कदम, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख श्री. यशवंत सगळे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी शहाड गावठाण येथील कोसळलेल्या संरक्षक भिंतीचा परिसर, शांतीनगर येथील एसटीपी, चोप्रा कोर्टमागील परिसर, राजीव गांधी चौकातील हरनाम अपार्टमेंट परिसर (उल्हासनगर-४) तसेच हनुमान नगर (उल्हासनगर-२) येथे पडलेल्या वृक्षाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान आयुक्तांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देत धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच पडलेले वृक्ष आणि मलबा त्वरित हटविणे, आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू करणे आणि सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन मान्सून काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक आणि तातडीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





























