- पाणी समस्या बाबत प्रभाग समिती कार्यालयाबाहेर निदर्शने
- समस्या न सुटल्यास आत्मदहनाचा इशारा
उल्हासनगर दि.२६ : उल्हासनगरातील कॅम्प नं ५ परिसरातील वीरतानाजी नगर मधील पॅनल क्रमांक १९ या वस्तीत गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची भीषण समस्या नागरिकांना भेडसावत आहे. या पाणी समस्यामुळे महिला वर्गांना वणवण भटकावे लागत असल्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. पालिकेला अनेक वेळा निवेदन देऊनही ही समस्या सुटत नसल्याने अखेर प्रभाग समिती ४ च्या कार्यालयाबाहेर पाण्याच्या समस्या बाबत निदर्शने करण्यात आली.

उल्हासनगर महापालिका आयुक्त, पाणीपुरवठा विभाग अधिकारी यांना वेळोवेळी पाणी समस्या बाबत निवेदन देऊनही या समस्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ सोमवारी उल्हासनगरातील प्रभाग समिती – ४ कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग माजी अध्यक्ष दिपक सोनोने, उत्तर भारतीय विभाग अध्यक्ष अनिल यादव, परिवहन विभाग अध्यक्ष आबासाहेब साठे, बाबारावआढाव, कृष्ण बावस्कर, मोहन वाघ, शिवाजी आव्हालगे, दीपक पाखरे, आदी पदाधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकारी यांना निवेदन देऊन सदर समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी केली. हि समस्या न सुटल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.





























