उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी गुरवारी दि. ३० जुलै रोजी महानगरपालिकेच्या ‘घे भरारी’ या विशेष शैक्षणिक उपक्रमांतर्गत मनपा शाळा क्र. २४ ला भेट देऊन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला अपेक्षित अध्ययन स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी अधिक समर्पितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भेटी दरम्यान आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गांना भेट देऊन अध्यापन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान तसेच अध्ययन स्तराची पडताळणी केली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे कौतुक करत प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन क्षमतेनुसार स्तराधारित अध्यापन करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी शिक्षकांना दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या वर्गकार्याच्या वह्या, शिक्षकांच्या नोंदवह्या, टाचणवह्या, स्तर निश्चिती नोंदी तसेच साप्ताहिक प्रगती अहवालांची तपासणी करण्यात आली. ‘घे भरारी’ उपक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध नोंदींचा बारकाईने आढावा घेत आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

त्यानंतर शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासमवेत आयोजित बैठकीत ‘घे भरारी’ उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्तराधारित अध्यापन, विद्यार्थ्यांचा नियमित सराव, सातत्यपूर्ण मूल्यमापन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीची अचूक नोंद, पालकांचा सक्रिय सहभाग तसेच आनंददायी आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण वातावरणाची निर्मिती यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी आयुक्त श्रीम. मनिषा आव्हाळे म्हणाल्या की, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविणे हे महानगरपालिकेचे प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने कार्य करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्याने पाठपुरावा करत ‘घे भरारी’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला अपेक्षित अध्ययन स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.’घे भरारी’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत भाषा कौशल्यांसह गणितीय संकल्पना अधिक सक्षम होतील, तसेच त्यांच्या वाचन, लेखन आणि संख्याज्ञानामध्ये लक्षणीय सुधारणा घडून येईल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला. अशी माहिती प्रसिद्धिपत्रद्वारे उल्हासनगर महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांनी दिली.





























