उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत उल्हासनगर-४ येथील समता नगर परिसरात मॅनहोलमध्ये प्रत्यक्ष स्वच्छता कर्मचाऱ्याला उतरवून गटार साफसफाई करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २९ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या प्रकारामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मानवी जीवाशी खेळ करणाऱ्या या घटनेविरोधात स्वराज्य संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वराज्य संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. जय गायकवाड यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि या प्रकारासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, “The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013” या केंद्रीय कायद्यानुसार मॅनहोलमध्ये मनुष्य उतरवून साफसफाई करण्यास स्पष्टपणे बंदी आहे. आवश्यक सुरक्षासाहित्य, यांत्रिक उपकरणे आणि सुरक्षा नियमांचे पालन न करता अशा प्रकारे काम करून घेणे हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून संबंधित कर्मचाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणारे कृत्य आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना ॲड. जय गायकवाड म्हणाले की, भारतातील दलित समाजाला शतकानुशतके जातीच्या आधारावर अशा अमानवी आणि अपमानास्पद कामांमध्ये ढकलण्यात आले. सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या देशात आजही अशा घटना घडत असतील, तर तो केवळ प्रशासकीय निष्काळजीपणा नसून जातीय शोषणाच्या मानसिकतेचेही द्योतक आहे. अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही.

स्वराज्य संघटनेने आपल्या तक्रारीत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महानगरपालिकेने सर्व गटार व मॅनहोल साफसफाईची कामे आधुनिक यांत्रिक साधनांद्वारेच करण्याची सक्ती करावी, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा उपकरणे, प्रशिक्षण आणि मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही केली आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास किंवा भविष्यातही अशाच प्रकारे अमानवी पद्धतीने स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतल्यास स्वराज्य संघटना संविधानिक आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही ॲड. जय गायकवाड यांनी दिला आहे. मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





























