बदलापूर दि.३० ( प्रमोद दळवी ) : बदलापूर शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. शहरातील एका मोठ्या खड्ड्याचा ‘लाडका खड्डा’ म्हणून तिसरा वाढदिवस केक कापून आणि फटाके वाजवून साजरा करत नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

शहरातील रस्त्यांवर वारंवार त्याच ठिकाणी खड्डे पडत असून, त्याबाबत अनेक वेळा आंदोलने, निवेदने आणि पत्रव्यवहार करूनही नगरपालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. विशेषतः पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती न केल्यामुळे पूर्व आणि पश्चिम बदलापूरमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खड्ड्याला केक भरवून त्याचा प्रतीकात्मक वाढदिवस साजरा केला. त्यानंतर उर्वरित केक उपस्थित कार्यकर्ते तसेच शाळेच्या बस चालक, रिक्षा चालक, ऑटोचालक, दुचाकीस्वार आणि नागरिकांना भरवून खड्ड्यांच्या समस्येविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काही काळ रस्ता रोको आंदोलन करत नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येत्या चार ते पाच दिवसांत शहरातील खड्डे तातडीने बुजवले नाहीत, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पुढाकाराने हे आंदोलन आयोजित करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख किशोर पाटील, ज्येष्ठ समाजसेवक नाना देशमुख, नागेश बरे, हेमंत पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा पर्यावरण प्रमुख प्रदीप रोकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव राजेश वानखडे, महिला उपाध्यक्ष मनीषा पोळ, मनोज शुक्ला, सिद्धार्थ खरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता नगरपालिका प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.





























