उल्हासनगर दि.२३ ( प्रमोद दळवी ) : सरला बिर्ला हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा – २०२६-२७ मध्ये सेंट जोसेफ बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूल, उल्हासनगरच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. शाळेच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद (रौप्यपदक) पटकावले . १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक (कांस्यपदक) मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली.

१७ वर्षांखालील मुलांच्या संघाने स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात दमदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली. कर्णधार अर्पित मोरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर उपविजेतेपद मिळवले. या संघात अंश, अर्पित, सक्षम, हर्ष, लोकेश, सुदैम, शुभम, ओम, लक्ष, राहुल, अहमद, जतिन, सोहम, जिशान, वीरेन आणि तुषार या खेळाडूंनी उल्लेखनीय योगदान दिले.तसेच, १७ वर्षांखालील मुलींच्या गटात कर्णधार श्रावणी कुठे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला. या संघात प्रांजल, श्रावणी, एडना, निधी, चंचल, गौरी, दिव्यांशी, अधीरा, साक्षी, श्रेया, आशना, इशिका, तानिया आणि स्वरा या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली.

या यशामागे शाळेचे क्रीडा शिक्षक सागर खैरनार यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव, नियोजनबद्ध तयारी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेत उत्कृष्ट सांघिक समन्वय साधत जिल्हास्तरावरील स्पर्धेत यश संपादन केले. शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगतीत या यशाची महत्त्वपूर्ण नोंद झाली आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निथा यांनी सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक सागर खैरनार आणि पालकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा परिवार, पालक आणि विविध स्तरांतील मान्यवरांनीही संघांच्या यशाचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला. सुब्रतो मुखर्जी कपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मिळवलेल्या या यशामुळे सेंट जोसेफ बेथनी कॉन्व्हेंट हायस्कूलच्या क्रीडा परंपरेत आणखी एका गौरवशाली अध्यायाची भर पडली असून, भविष्यातही राज्य व राष्ट्रीय स्तरावर अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्याचा विश्वास शाळा परिवाराने व्यक्त केला आहे.





























