उल्हासनगर, दि. ९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिका शाळा क्रमांक १७ परिसरातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली सुसज्ज शैक्षणिक अभ्यासिका अनेक महिन्यांपासून सुरू न झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका सुरेखा हनुमंत आव्हाड आणि शोभाताई दिनकर जाधव यांनी गुरुवारी धरणे आंदोलन व उपोषण सुरू केले. आंदोलनाचा तात्काळ परिणाम दिसून आला असून महानगरपालिका प्रशासनाने अखेर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली केली आहे. मात्र ७ दिवसात अभ्यासिका पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित होणार आहे असे पत्र नगरसेविका श्रीमती शोभाताई जाधव यांना उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक ३, .सी. ब्लॉक, पॅनल क्रमांक ४ येथील महापालिका शाळा क्रमांक १७ जवळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज अभ्यासिका उभारण्यात आली होती. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही विद्यार्थ्यांना तिचा लाभ मिळत नसल्याने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर नगरसेविका सुरेखा आव्हाड आणि शोभाताई जाधव यांनी पालिका प्रशासनाला अभ्यासिका तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. मागणी मान्य न झाल्यास उपोषण आणि धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी आंदोलन सुरू होताच पालिका प्रशासनाने तातडीने अभ्यासिकेचे संचालन सुरू केले.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी सांगितले की, आजपासून विद्यार्थी अभ्यासिकेत बसून अभ्यास करू शकतात. तसेच इंटरनेटसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू करण्यात आले असून येत्या मंगळवारपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करून अभ्यासिका पूर्ण क्षमतेने विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
आंदोलनादरम्यान नगरसेविकांनी अभ्यासिकेत इंटरनेट, पुस्तके, आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच इमारतीमध्ये ओलावा (सीलन) असल्याने त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी या सर्व समस्या तात्काळ सोडवाव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलनाच्या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी आणि महापालिका कर्मचारी राजेश घनघाव यांच्यात काही मुद्द्यांवर शाब्दिक वादही झाला. मात्र आंदोलन अधिक तीव्र होण्यापूर्वीच प्रशासनाने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी याचे स्वागत केले.
“अभ्यासिका सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारीया हे देखील उपस्थित होते. या आंदोलनात प्रियांका गौतम जाधव, आशाताई कदम, शिवानी सिंह, नंदा सिंथल, हनुमंत कचरे, विजय जाधव, प्रमोद पानपाटील, मनोहर बहनवाल, हरिहर तिडके, मुकेश चौथमल, संतोष चौधरी, निलेश आमनानी, हर्ष बहनवाल, गौरव पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.





























