उल्हासनगर दि. ३० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या विकासकामांसाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करूनही उल्हासनगर शहराची परिस्थिती जैसी थी वैशीच दिसून येत असल्याचे चित्र उल्हासनगरातील कॅम्प नंबर -३ येथील शिवाजी चौकात पाहायला मिळत आहे. पहिल्याच पावसात शिवाजी चौकातील रस्ता पाण्याखाली जात असल्याने कल्याण बदलापूरच्या या रोडवर वाहन चालकांना रस्त्यावरील या पाण्यातून वाहने नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यापाऱ्यांच्या दुकानदारी हे साचलेले पाणी शिरत असल्याने त्यांच्यात देखील संतप्त वातावरण निर्माण झाले आहे.

कल्याण बदलापूरच्या या रस्त्याचे काम नुकताच करण्यात आले आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांचे काम देखील भर पावसात सुरू आहे. खरंतर या नाल्यांची कामे पावसाळा सुरू होण्याआधीच करायला पाहिजे होती. कामासाठी खोदून ठेवलेल्या नाल्या, त्यात साचलेले सांडपाणी, अर्धवट रखडलेल्या नाल्या यावरून उल्हासनगरचा विकास कसा होत आहे हे त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागात देखील नाल्यांची साफसफाई पाहिजे तशी झालेली नाहीये. पहिल्याच पावसामध्ये शहरातील काही ठिकाणी नाल्यात तुंबलेल्या दिसून येत आहेत.
विकासकामांच्या नावाने डंका पिटणाऱ्या महानगरपालिकेने विशेषता महापौर आणि पालिका आयुक्तांनी उल्हासनगर शहरात अनेक भागात दौरा करून याची पाहणी करणे गरजेचे आहे. पण पहिल्याच पावसात जर ही परिस्थिती असेल तर मुसळधार पावसामध्ये शहरात नक्कीच पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार, खासदार करोडो रुपयांचा निधी उल्हासनगरच्या विकास कामांसाठी उपलब्ध करून देत आहेत. पण हा निधी विकासकामांना अशा पद्धतीने वापरला जातो याची देखील पाहणी करणे गरजेचेअसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. शहरातील मुख्य रस्ता म्हणून समजला जाणाऱ्या उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ३ येथील शिवाजी चौकातील रस्ता काही प्रमाणात त्या ठिकाणी रखडलेला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण जरी झाले असले तरी नुकताच बनवलेल्या रस्त्यांना तडे देखील गेलेले आहेत. याशिवाय पहिल्याच पावसात या रस्त्यात पाणी साचून राहत असल्यामुळे व पाण्याला जायला मार्गच नसल्यामुळे त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असते. मुसळधार पावसात तर हा रस्ता जलमय होऊ शकतो. उल्हासनगर महानगरपालिकेने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने, तसेच स्थानिक आमदार आणि खासदार यांनी देखील या समस्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे व्यापारी वर्गांसह नागरिकांमध्ये बोलले जात आहे.





























