- आमदारांच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दिला वेळ
उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : म्हारळ, वरप आणि कांबा गावांमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी आमदार कुमार आयलानी यांच्या पुढाकाराने एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तीन गावांचे प्रतिनिधी, महामार्ग विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. आमदार कुमार आयलानी यांनी समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांकडे कालमर्यादेत कृती आराखड्याची मागणी केली आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संबंधित काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन मिळवले.

वरप गावाजवळ नुकत्याच झालेल्या एका रस्ते अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. शिवाय, या मार्गावर अपघात वारंवार घडत असतात. महामार्गालगत गतिरोधकांचा अभाव, अपुरी प्रकाशव्यवस्था, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि अस्वच्छता ही या अपघातांची कारणे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या गंभीर समस्यांची दखल घेऊन आमदार कुमार आयलानी यांनी महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांना तात्काळ बैठकीसाठी बोलावले.बैठकीत गावकऱ्यांनी त्यांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. आमदार कुमार आयलानी यांनी अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी स्पष्ट कालमर्यादा देण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, महामार्गावर रम्बलर (Rumbler Strips) बसवणे, दुभाजकांना रंग देणे आणि कचरा साफ करणे ही कामे एका आठवड्यात पूर्ण केली जातील. त्यांनी असेही सांगितले की महामार्गालगतच्या ढाबा चालकांना रस्त्यावर वाहने उभी न करण्याच्या सूचना दिल्या जातील आणि साफसफाईच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जाईल.बैठकीदरम्यान, आमदार कुमार आयलानी यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल यांच्याशी फोनवर संवाद साधला, त्यांना गावकऱ्यांच्या समस्यांची माहिती दिली आणि ग्राम प्रतिनिधींसोबत बैठकीची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पुढील मंगळवारी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत गावकऱ्यांना त्यांच्या समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडता येतील.

आमदार कुमार आयलानी यांनी उपस्थित नागरिकांना आश्वासन दिले की, महामार्गाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि सर्व आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील जेणेकरून भविष्यात अपघातांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा पुरवता येईल.या बैठकीत महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. म्हारळ गावातील प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, लक्ष्मण कोंगरे, महेश देशमुख, रोशन झा, बालू गोरे, जगन्नाथ शेट्टी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. वरप गावातील राजेश भोईर, अश्विन भोईर, हनुमान भोईर, डॉ. भगवान भोईर आणि कांबा गावातील दत्ता भोईर, राजेश, विट्ठल पावशे, चंद्रकांत भगत, उमेश सोनार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.





























