उल्हासनगर दि.२८ ( प्रमोद दळवी ) : मध्यवर्ती हॉस्पिटलमधील विविध समस्या आणि त्यांच्या तात्काळ निराकरणासाठी आमदार कुमार आयलानी यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मध्यवर्ती हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर सहभागी झाले होते आणि हॉस्पिटलशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीदरम्यान, आमदार कुमार आयलानी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे आणि उपस्थित डॉक्टरांकडून हॉस्पिटलला भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती घेतली आणि त्यांच्या गरजा लक्षपूर्वक ऐकून घेतल्या. हॉस्पिटलच्या सुविधा सुधारण्यासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी, हॉस्पिटलचा ऑक्सिजन प्लांट, अग्निशमन यंत्रणा, औषधांची पुरेशी उपलब्धता, दैनंदिन वैद्यकीय उपकरणे आणि साहित्य, खाटांची संख्या वाढवणे, कार्डियाक केअर युनिटच्या बांधकामातील प्रगती, हॉस्पिटल परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करणे आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.आमदार कुमार आयलानी यांनी सर्व डॉक्टरांना आश्वासन दिले की, ते रुग्णालयाच्या सार्वजनिक हिताशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी नेहमी उपलब्ध राहतील आणि मध्यवर्ती रुग्णालयाला उत्तम सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील.





























