- वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
उल्हासनगर दि. ११ : सेंच्युरी रेयान हायस्कूलतर्फे रामलीला ग्राऊंड येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकांत गोरे उपाध्यक्ष एच आर यांच्या उपस्थितीने समारंभ अधिकच भव्य झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांना श्रीकांत गोरे यांनी अभ्यासाबरोबर खेळही महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वंदना युवराज भदाणे, होत्या. उपमुख्याध्यापक प्रमोद पारशी, तसेच पर्यवेक्षक दत्तात्रय दूधवडे, सौ. विद्याराणी जी. आणि सौ. सीता साहू यांची उपस्थिती लाभली. क्रीडा शिक्षक, इतर शिक्षकवर्ग आणि प्रिय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने मैदानाच्या ठिकाणी उत्साही वातावरण निर्माण झाले होते

या स्पर्धांमध्ये ८०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, रिले शर्यत, शॉटपुट आणि लांब उडी या स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळकौशल्य, जोश आणि क्रीडाभाव दाखवत सर्व स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. मुख्याध्यापिका सौ. भदाणे, यांनी विद्यार्थ्यांना क्रीडेसोबतच शिस्त, सहकार्य आणि चिकाटी या गुणांचे महत्त्व पटवून दिले. समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या क्रीडा विभागाने केले. उत्साह, ऊर्जा आणि स्पर्धात्मकतेने भरलेला हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.





























