उल्हासनगर दि १० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन परिसरात सपना गार्डन येथे असणाऱ्या केसवानी कॉम्प्लेक्सची बी विंग ही इमारत अतिधोकादायक असल्यामुळे पालिकेने बुधवारी या इमारतीवर बुलडोझर फिरवला. उल्हासनगरतील कॅम्प नंबर तीन येथे सपना गार्डन परिसरात केसवानी कॉम्प्लेक्स ही बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमध्ये ए विंग आणि बी विंग या दोन इमारती असून उल्हासनगर महापालिकेने २०२१ ला केसवानी कॉम्प्लेक्स ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती. पालिकेने या इमारतीला नोटीस देऊन ती इमारत पूर्णपणे खाली करण्यास सांगितले होते. याशिवाय त्या बिल्डिंगचा स्लॅब पडल्यामुळे ती इमारत अति धोकादायक स्थितीत झाली होती.

पालिकेने बिल्डिंग धारकांना ती बिल्डिंग रिपेअर करा किंवा ती पाडून टाका असे देखील सांगण्यात आले होते. ए विंगच्या इमारत धारकांनी त्यांची इमारत चेक करून पालिकेला रिपोर्ट दिला की बिल्डिंग स्टेबल आहे. पण बी विंगच्या धारकांनी गेल्या चार वर्षांपासून कोणतीच कारवाई केली नव्हती. याशिवाय पावसाळ्यात केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंगची खूपच दुरवस्था झाली होती. पालिकेने इंजिनीयर पाठवून त्या बिल्डिंगची तपासणी केली असता इंजिनीयरने पालिकेला रिपोर्ट दिला की ही इमारत सी-१ कॅटेगिरी मध्ये येत आहे. त्यामुळे बी विंग इमारतीला डीमॉलिश करणे गरजेचे आहे असा अहवाल दिला. केसवानी कॉम्प्लेक्सची बी विंग इमारत ही मेन रोड व मार्केट एरिया मध्ये असल्यामुळे केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. बुधवारी महानगरपालिकेचे वतीने केसवानी कॉम्प्लेक्सच्या बी विंग इमारतीवर बुलडोझर फिरण्यास सुरुवात केली असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.




























