उल्हासनगर दि १ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर मधील कॅम्प नंबर – ५ परिसरातील कैलास नगर येथील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून वारंवार महापालिकेला पाठपुरावा करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने त्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेला जाग यावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी पोतराजची भूमिका साकारत चक्क स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारून उल्हासनगर महापालिकेच्या विरोधात निषेध नोंदवला.

उल्हासनगरातील कॅम्प नंबर – ५ परिसरातील कैलास नगर, गणेश नगर, तानाजी नगर व पॅनल क्रमांक १७ मधील नागरिक मूलभूत सुविधांसाठी त्रस्त आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या अद्याप पर्यंत सुटल्या गेल्या नाहीत. सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था, शौचालयाच्या परिसरात व सौचालयात घाणीचे साम्राज्य, दरवाजे तुटलेले, नळाला पाणी नाही, रस्त्यांची दुरावस्था, सहा महिन्यापूर्वी कोसळलेला नाला अद्याप बनवला नाही, नळाला येणाऱ्या गढूळ पाणी, अशा अनेक समस्यांनी त्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

वारंवार पालिकेला निवेदन देऊनही या समस्या काही अद्याप पर्यंत सुटल्या गेल्या नाही असे सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी सांगितले. या आधी देखील अनेक आंदोलन करण्यात आली. पण पालिकेला काही जाग येत नाही. महापालिकेला जाग यावी, व या परिसरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या याकरिता आपण आज पोतराजची भूमिका करत स्वतःच्या अंगावर चाबुकाचे फटके मारून हा अनोखा पद्धतीचा आंदोलन केला असल्याचे साठे यांनी सांगितले. पालिका प्रशासनाने या समस्या त्वरित सोडवाव्या अशी मागणी साठे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.





























