उल्हासनगर दि.७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरामध्ये अनेक महिला बचत गट कार्यरत आहेत. बचत गटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी महापालिकेच्या वतीने स्टॉल देण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेच्या वतीने महिला बचत गटाच्या अनेक बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत स्टॉलसाठी महिलांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार करून ठेवण्यात आलेले स्टॉल शहरांमधील अनेक भागांमध्ये पावसात भिजत पडले आहेत. अद्याप पर्यंत या स्टॉलचे वाटप करण्यात आले नसल्याने शिवसेना उल्हासनगर महानगरप्रमुख व मा. नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी पालिकेला निवेदन देत बचत गटातील महिलांना या स्टॉलचे वाटप त्वरित करण्यात यावे अन्यथा ज्या ठिकाणी ते स्टॉल आहेत त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्याचे उद्घाटन करून महिला बचत गटांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

उल्हासनगरमधील महिलांना स्वयंरोजगाराशी जोडण्याच्या उद्देशाने उल्हासनगर महानगरपालिकेने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित आहे. महिला व बालकल्याण विभागा अंतर्गत शहरातील ५० महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल्स देण्याची योजना आखण्यात आली होती, परंतु आजपर्यंत ते स्टॉल्स वितरित झालेले नाहीत.

उल्हासनगर रेल्वे स्टेशन, बिर्ला गेट, बस स्टँड आणि माध्यमिक रुग्णालय यासारख्या शहरातील प्रमुख ठिकाणांजवळ ते स्टॉल्स ठेवण्यात आले होते. परंतु महिने उलटूनही हे स्टॉल्स केवळ सजावटीचे साधन राहिले आहेत. महिला वारंवार महानगरपालिका कार्यालयात जाऊन थकल्या आहेत, परंतु आतापर्यंत स्टॉल्स वाटपासाठी कोणतीही निश्चित तारीख निघालेली नाही. या योजनेसाठी ७८ महिला बचत गटांनी अर्ज केले होते, त्यापैकी ५० जणांची निवड करण्यात आली. प्रत्येक स्टॉलसाठी महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. स्टॉल्समध्ये ठेवलेल्या खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्य आता खराब होण्याच्या स्थितीत आहेत. मुसळधार पावसात भिजत असलेल्या त्या स्टॉल्सची स्थिती पाहता, जर लवकर वाटप झाले नाही तर कोट्यवधींची ही योजना केवळ एक अयशस्वी प्रयत्न राहील हे स्पष्ट होते. उल्हासनगरमध्ये सुमारे १५०० महिला बचत गट सक्रिय आहेत, ज्यामध्ये सुमारे १५,००० महिला काम करतात. यापैकी अनेक महिला बेरोजगार आहेत आणि या योजनेद्वारे त्या स्वावलंबी होण्याची आशा बाळगत आहेत.
.





























