- उल्हासनगर महापालिकेतील समिती सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध
- जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत घोषणा
- ९ विशेष समित्यां पैकी ४ समित्या भाजपकडे तर ५ समित्या शिंदेसेना व मित्र पक्षांकडे
- उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महिला राज
उल्हासनगर दि. २० ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती व ९ विशेष समिती सभापती”पदासाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी १५ एप्रिल रोजी उल्हासनगर महापालिका सचिव अनंत जावद्वार यांच्याकडे दाखल करण्यात आले होते . प्रत्येक समितीसाठी एकच अर्ज त्यावेळी प्राप्त झाल्याने सर्व पदांची निवड बिनविरोध झाल्याचा स्पष्ट झाले होते. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी उल्हासनगर महापालिकेच्या सोमवारी २० एप्रिल २०२६ रोजी झालेल्या महासभेत स्थायी समिती सभापती पदासह अन्य सभापती पदाची अधिकृत घोषणा केली. उल्हासनगर महापालिकेच्या राजकारणात अखेर सत्तेची समीकरणे स्पष्ट झाली असून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती सभापती पदी शिंदेसेनेचे कलवंत सिंग सोहता यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

उल्हासनगर महापालिका निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यानंतर सत्तेसाठी एकत्र आलेल्या भाजप आणि शिंदेसेनेने विविध पदांचे वाटप सामंजस्याने केले आहे. सध्या महापालिकेत महापौरपद शिंदेसेनेच्या अश्विनी निकम यांच्याकडे, तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. याच धर्तीवर स्थायी समितीसह अन्य ९ विशेष समित्यांचेही सोमवारी वाटप पूर्ण झाले आहे.स्थायी समिती सभापती पदासाठी शिवसेना नगरसेवक कलवंत सिंग सोहता याची निवड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदासाठी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी, नियोजन व विकास समिती सभापती पदासाठी भाजपच्या मीना कौर अजित सिंग लबाना, पाणी पुरवठा व जलनिसारण समिती सभापती पदासाठी भाजपच्या दीपा नारायण पंजाबी, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या सविता तोरणे-रगडे , माध्यमिक व पूर्व प्राथमिक शिक्षण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या साक्षी सुर्वे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदासाठी भाजपच्या विपुल मयेकर, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक समिती सभापती पदासाठी भाजपच्या प्रीती विनोद मखिजा, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या मीना दीपक सोंडे, तर महसूल समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या प्रेरणा अजित मखिजानी यांची निवड घोषित करण्यात आली.

एकूण ९ विशेष समित्यां पैकी ४ समित्या भाजपकडे तर ५ समित्या शिंदेसेना व मित्र पक्षांकडे गेल्या आहेत. सर्व पदांसाठी एकच अर्ज आल्याने कोणत्याही प्रकारचा संघर्ष न होता ही निवड प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. यामुळे आता महापालिकेच्या प्रशासकीय कामाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सोमवारी झालेल्या अधिकृत घोषणेनंतर संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर,माजी आमदार पप्पू कालानी, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, गटनेता अरुण आशान,शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष राजेश वधारिया यांच्या मार्फत अभिनंदन करण्यात आले. यावेळी महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडीमुळे महापालिकेच्या कारभारात स्थिरता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

शिवसेना गटनेता अरुण आशान यांनी सांगितले शिवसेना पक्षप्रमुख व या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व लाडके खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी कलवंत सिंग सोहता उर्फ बिट्टू भाई यांची सभापती म्हणून निवड झाली आहे.आता या हानगरपालिके मध्ये महिलाराज आहे. कारण महापालिकेच्या महापौर या महिला आहेत आणि निवड झालेल्या सर्व सभापती या महिला आहेत त्यामुळे शिंदे साहेबांच्या सर्व लाडक्या बहिणी या सभापतीपदी विराजमान झाल्या आहेत या सर्वांचं अरुण आशान यांनी अभिनंदन केले .समाजसेवक राजा गेमनानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कलवंत सिंग सोहता यांचे अभिनंदन केले






























