शहाड दि २७ : विठोबा मंदिर परिसरात ऋषिकेश येथून पधारलेले पूज्य स्वामी श्री मैथिलीशरणजी यांच्या सान्निध्यात ७ दिवसीय श्रीरामचरितमानस प्रवचनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रवचन मालिके दरम्यान स्वामीजींनी रामचरितमानसातील विविध प्रसंग अत्यंत सोप्या आणि सारगर्भित पद्धतीने मांडत उपस्थित भाविकांना जीवन अर्थपूर्ण कसे करावे याचा संदेश दिला.

आपल्या प्रवचनात त्यांनी सांगितले की रामचरितमानस हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून एक उत्कृष्ट जीवनदर्शन आहे, जो मानवाला योग्य मार्ग दाखवतो. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या आदर्शांना आजच्या जीवनाशी जोडत त्याग, कर्तव्य, संयम आणि निष्ठा यांचे महत्त्व स्पष्ट केले.
स्वामीजींनी सध्याच्या तरुण पिढीला सत्संगाशी जोडण्याची गरज अधोरेखित करत पालकांना मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचे आवाहन केले. रामनवमीच्या निमित्ताने सेंचुरी रेयान परिसरात स्वामीजींनी आपल्या भजन मंडळीसह रामजन्मोत्सवा निमित्त भजने सादर केली. ती ऐकून भाविक भावविभोर झाले.
या प्रसंगी श्री ओ. आर. चितलांगे आणि श्री दिग्विजय पांडे यांनी स्वामीजींच्या मंत्रोच्चारासह भगवान श्रीरामांची विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली. शेवटी प्रसाद आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.





























